नागपूर : शहारातील एका डॉक्टर महिलेला कुत्रा पाळणे महागात पडले आहे. या पाळीव कुत्र्याने 9 वर्षाच्या मुलाला चावल्याने या महिलेला आता तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायाधीश जे.डी. जाधव यांनी या महिलेला 6 महिने कारावास आणि 5 हजारच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. डॉ. संगीता बालकोटे (वय ४९) असे या डॉक्टरचे नाव आहे.
सात वर्षांपूर्वी घडली होती घटना..
नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत श्रीकृष्णनगर येथे डॉ. संगीता राहत असलेल्या परिसरात एक 9 वर्षाचा मुलगा खेळत होता. दरम्यान, बालकोटे यांचा पाळीव कुत्रा आणि अन्य एका कुत्र्याने मुलाच्या अंगावर धाव घेत, त्याचा चावा घेतला. यात मुलाच्या पायाला, खांद्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली. यात सोनल बंदकुले यांनी आपला 9 वर्षीय मुलगा आर्यवर्षला चावलेल्या कुत्र्याच्या मालकाविरोधात नंदनवन पोलीस स्थानकात 29 जुन 2014 मध्ये तक्रार नोंदवली होती. यात कुत्रा पाळताना केलेली हलगर्जीपणा म्हणून गुन्ह्याची नोंद झाली होती.