नागपूर -राज्यभर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगासाठी 'लेखणी बंद'आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आजपासून पूर्णतः 'काम बंद' आंदोलनाला सुरुवात केली आहे. विद्यापीठ परिसरातील प्रशासकीय इमारती बाहेर हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये ५६० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन पुढेही सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन; ७वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी - नागपूर विद्यापीठ कर्मचारी आंदोलन
राज्यातील 14 विद्यापीठात असलेल्या तब्बल 17 हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राज्यभरात लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या आंदोलनकर्त्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाइन बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधानी नसलेल्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अजूनही पूर्ण न झाल्याने 'काम बंद' आंदोलन करावे लागत आहे, असे आंदोलकांनी सांगितले.
राज्यभर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या होऊ घातलेल्या परिक्षाही पुढे ढकलल्या आहेत. या आंदोलनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना फटका बसत आहे. राज्यशासनाने या परिस्थितीतून लवकर मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.