नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस पदव्या तयार करुन दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या बोगस पदव्याच्या आधारे परदेशात नोकऱ्या मिळवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराकमधील भारताच्या दुतावासाने नागपूर विद्यापीठाला संपर्क साधला तेव्हा हा गैरप्रकार समोर आला. दुतावासाने बोगस पदवी असलेल्या 27 जणांची यादी नागपूर विद्यापीठाकडे पाठवली आहे. विद्यापीठाने ही यादी तपासली असून हे 27 जण विद्यापीठाचे विद्यार्थी नसल्याचे समोर आहे.
विद्यापीठाने माहिती केंद्राला कळवली - नागपूर विद्यापीठाने संपूर्ण प्रकरणाची माहिती केंद्र सरकारचा शिक्षण विभाग, परराष्ट्र मंत्रायल, गृहविभाग व विद्यापीठ अनुदान आयोगाला कळवली आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडून अद्याप पोलीस तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र, नागपूर विद्यापीठाने इराक दूतावासाला या सर्व २७ डिग्री बोगस असल्याचे सांगितले आहे.
कोरोना काळात तयार केल्या पदव्या:इराकमधील भारतीय दुतावासाने नागपूर विद्यापीठाला याविषयी माहिती दिल्यानंतर बनावट पदव्यांचे प्रकरण समोर आले. दुतावासाने पाठवलेल्या बनावट पदव्याच्या यादीत 27 पदव्याचे माहिती दिली आहे. नागपूर विद्यापीठाणे संपूर्ण यादी तपासली तेव्हा २७ पैकी एकही जण नागपूर विद्यापीठ हद्दीतील कुठल्याही महाविद्यालयात शिकलेला नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या बनावट डिग्री तयार करणाऱ्यांनी नागपूर विद्यापीठाचा लोगो आणि कुलगुरूंची खोटी सह्या वापरून या बोगस पदव्या तयार केल्या होत्या. या २७ पदव्यांपैकी २४ फार्मसी, २ अभियांत्रिकी आणि १ मायक्रोबायोलॉजीच्या आहेत. विशेष म्हणजे या पदव्या २०१७,२०१९ आणि २०२० या वर्षातील आहेत. २०१९ ते २०२० हा कोरोना काळ होता.