नागपूर -धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालवण्यावर आळा घालण्यासाठी नागपूरच्या वाहतूक विभागाने शहरात जागोजागी नाकेबंदी केली होती. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी नागपुरात अपघात मुक्त होळी साजरी झाली आहे. मात्र, यावेळी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या १ हजार २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नागपुरात दारू पिऊन वाहन चालणाऱ्या 1 हजार 26 जणांवर कारवाई - नागपूर लेटेस्ट न्यूज
मंगळवारी धुळवड साजरी झाली. मात्र, यादिवशी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे नागपूर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती.
धुळवड साजरी करताना तरुणाई उत्साहाच्या भरात वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जुना इतिहास लक्षात घेता नागपूर वाहतूक विभागाने शहरात तब्बल ५० ठिकाणी नाकेबंदी केली होती. तळीरामांवर सतत ३ दिवस वाहतूक पोलिसांची करड नजर होती. संपूर्ण नागपूर शहर धुलीवंदनाच्या रंगात बुडाले असताना वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र नागपूरकरांची होळी शांततेत पार पडावी यासाठी रस्त्यावर पहारा देत होते.
अनेकजण दारू पिऊन वाहन चालवताना वेगमार्यादा ओलांडतात. तसेच ट्रिपलसीट गाडी चुकीच्या बाजूनी चालवतात. यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार २६ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच गेल्या ३ दिवसात एकूण ३ हजार ५१६ वाहन चालकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या १ हजार २६ इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 168 ने वाढली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर शहर वाहतूक विभागाने ड्रंक अँड ड्राइव्हच्या सर्वात जास्त तक्रारी नोंदवल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले.