नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपची उमेदवारी मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार यांना जाहीर झाली. त्यामुळे निश्चितता संपली आहे. भाजपनेही गाणार यांना शेवटपर्यत पाठींबा जाहीर न केल्यामुळे अनिश्चितता होती. मात्र गाणार यांच्या उमेदवारीची बुधवारी अधिकृत घोषणा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.
उमेदवार केले घोषित : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. एक काँग्रेसचा उमेदवार सोडला तर शिक्षक भारती, शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार घोषित केले आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले आणि भाजप समर्थीत शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. आता काँग्रेस कोणाला पाठिंबा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गाणार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा : नागपूर विभागातून भाजप समर्थक नागो गाणार हे गेल्या दोन टर्मपासून प्रतिनिधित्व करत आहेत. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक आहेत. यावेळी काँग्रेसनेही कोणाला पाठींबा दिलेला नाही. भाजपच्या सहकार आघाडीचे प्रदेश संयोजक प्रा. संजय भेंडे, माजी महापौर प्रा. कल्पना पांडे, शिक्षक परिषदेचे सचिव योगेश बन यांची नावे चर्चेत होती.
'हे' महाविकास आघाडीचे उमेदवार : शिक्षक भारतीने राजेंद्र झाडे यांना उमेदवारी दिलेली आहे. मागील निवडणुकीत 35,009 मतदार होते. यावर्षी 39,406 मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आचारसंहिता राहणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या शिक्षक सेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. गंगाधरराव नाकाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष अभ्यंकर यांनी जाहीर केले आहे.
वाढले महाविकास आघाडीचे टेन्शन :नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे आता काँग्रेसने शिक्षक भारतीला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे. पण काँग्रेसचे अद्याप काहीही ठरले नसल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे.
भाजपच्या उमेदवारीसाठी तीन प्रबळ दावेदार :विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विश्वनाथ डायगव्हाणे यांनी 8 महिन्यांपूर्वीच या निवडणुकीसाठी चंद्रपूरचे सुधाकर अडबाले यांची उमेदवारी जारी केली. शिक्षक भारतीचे कपिल भारती यांनी राजेंद्र झाडे यांची महिनाभरापूर्वी घोषणा केली. या निवडणुकीच्या निमित्ताने झाडे हे तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. भाजपच्या उमेदवारीसाठी तीन प्रबळ दावेदार होते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस निवडून येणाऱ्या उमेद्वाराच्या पाठीशी राहु शकते.
राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे पुन्हा रिंगणात :शिक्षक मतदार संघापैकी औरंगाबाद, नागपूर आणि कोकणमध्ये विद्यमान आमदारांची मुदतही ७ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे निवडणुका होणार आहेत. तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे पुन्हा रिंगणात असणार आहेत. नागपूर शिक्षक मतदार संघात शिक्षक परिषदेने आमदार नागो गाणार यांना पुन्हा याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर :इतर निवडणुकांच्या तुलनेत शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक वेगळी असते. लोकसभा, विधानसभा मतदार संघांच्या होणाऱ्या निवडणुका आपल्याला माहित असतात. मात्र विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान २ पदवीधर आणि ३ शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण ५ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार ३० जानेवारीला मतदान होणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तर ४ फेब्रुवारीला मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
शिक्षक मतदार संघ :शिक्षक मतदार संघात राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक उमेदवाराला मतदान करतात. यातून निवडून आलेल्या शिक्षक आमदाराने विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न मांडावे, अशी अपेक्षा मतदार शिक्षकांची असते. पुणे, मुंबई, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद हे शिक्षक व पदवीधर मतदार संघ आहेत.
विधानपरिषदेची रचना :राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन मोठे सभागृह आहेत. यामध्ये विधानपरिषद वरीष्ठ सभागृह आहे. विधानपरिषदेत ७८ सदस्य असतात. यापैकी ३१ सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. तर २१ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जातात. १२ सदस्यांची निवड राज्यपाल करतात. ७ सदस्य शिक्षक मतदार संघातून तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात.