नागपूर - देशात पेट्रोलचे दर ९० च्या पार गेले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकार मात्र, झोपेत असल्यासारखे याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका करत नागपुरात शिवसेनेने आंदोलन केले. काल (शनिवार) शहरातील व्हेरायटी चौकात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांवर वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचाही निषेध करण्यात आले.
देशभरात कोरोनाचा संकट असताना इंधनाचे दर झपाट्याने वाढले आहेत. केंद्र सरकारने या विषयावर कोणतेही लक्ष न देता जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका शिवसेना शहर प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पेट्रोल दरावाढी विरोधात शिवसेने आंदोलन केले पेट्रोल दरवाढ नियंत्रणाची मागणी -
पेट्रोलचे वाढलेले दर केंद्र सरकारने नियंत्रणात आणावेत, अशी मागणी शिव सैनिकांकडून केली. रावसाहेब दानवे यांनी यापुढे बोलताना विचार करून बोलावे. अन्यथा शिवसेना त्यांच्याविरूध्दात आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही शिवसेना शहर प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी दिला.
काय म्हणाले होते दानवे?
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला होता. त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. रावसाहेब दानवेंना शेतकऱ्यांच्या व्यस्थांची जाणीव नाही. त्यामुळे ते शेतकऱ्यांबद्दल असे विधान करत आहेत, अशी टीका करत शिवसेनेने त्यांचाही निषेध केला.