नागपूर - गेल्या साडेसात महिन्यांपासून कुलूपबंद असलेले मंदिर कधी सुरू होतील, या निर्णयाकडे सर्व भक्तांच्या नजरा लागल्या आहेत. मंदिर बंद असले तरी मंदिराची रखरखाव करण्यासाठी लागणारा खर्च आणि कर्मचाऱ्यांचा पगार द्यावाच लागत असल्याने नागपुरातील अनेक प्रसिद्ध मंदिरांना आपल्या मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट) देखील तोडाव्या लागत आहेत. प्रसिद्ध साई मंदिर प्रशासनाला तब्बल अडीच कोटींच्या ठेवी तोडाव्या लागल्या आहेत. भक्तांना मंदिरात प्रवेश नसल्याने मंदिरांची आवक गेल्या साडेसात महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे अनेक संस्थांना आपला खर्च भागवणे देखील कठीण होऊन बसले आहे.
कोरोना संकटाचा फटका सर्वच क्षेत्राला बसलेला आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मंदिरांची आर्थिकघडी देखील विस्कळीत झाली आहे. अनलॉक नंतर आता बरेच उद्योगधंदे पुन्हा रुळावर येत आहेत. मात्र, मंदिराचं आर्थिक चक्र अजूनही अडकून पडल्याने आता पुढील खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न मंदिर संस्थांना पडला आहे.