नागपूर - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांसह राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या कायद्याविरोधात आज शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. याला अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, उपराजधानी नागपुरात अजूनपर्यंत तरी भारत बंदचा कुठलाच परिणाम दिसून आलेला नाही. इतर दिवसांप्रमाणे आज सकाळी देखील नागपुरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला राजकीय आणि सामाजिक संघटनांचे समर्थन प्राप्त झाले आहे. आज अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलन केली जाणार आहेत. भारत बंदच्या अनुषंगाने दोन मतप्रवाह वाहू लागले आहेत. एका गटाने या बंदला समर्थन दिले आहे तर, काहींनी यावर असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे बंदला नागपूर किती प्रतिसाद मिळतो हे ११ वाजल्याच्या नंतरच स्पष्ट होणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू -
भारत बंदच्या अनुषंगाने आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज सकाळपासूनच शहर बस सेवेसह मेट्रो सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमानी आपल्या कामावर अगदी आरामात पोहचत आहेत.