नागपूर : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसात राज्याच्या विविध भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मात्र, १४ ते १७ मार्च दरम्यान पुन्हा अवकाळी पावसाचे सावट असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे. यादरम्यान, अनेक विदर्भातील अनेक भागाला गारपिटीचा तडाखा देखील बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला आलेलं पीक १४ मार्च पूर्वी काढून सुरक्षित करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
पुन्हा एकदा संकट? : मध्यंतरी नागपूरसह विदर्भाला उन्हाचा तडाखा सहन करावा लागला होता. काही शहरात तर तापमानाचा पारा 38 डिग्रीपर्यंत गेला होता. त्यांतच अचानक वातावरण बदलल्याने गेल्या दोन दिवसा विदर्भातील नागपूर, वर्धासह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली आहे. या धक्क्यातून शेतकरी सावरला नसताना पुन्हा एका अस्मानी संकट उभे ठाकले आहे.
या दिवशी पावसाचा अंदाज : येत्या १४ मार्च ते १७ मार्च दरम्यान पुन्हा अवकाळी पावसाचे सावट असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर दरम्यानच्या काळात गारपीट देखील होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आजही विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे.