नागपूर: गेल्या आठ तासात नागपूर जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार अनुभवायला मिळाला आहे. प्रादेशिक वेधशाळेच्या माहितीनुसार, गेल्या ८ तासाच्या कालावधीत नागपुरात तब्बल १२१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात १६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे आत्तापर्यंत नागपूर येथे ७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, संध्याकाळपर्यंत हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुलै महिन्यात आत्तापर्यंत ३४७ मिलीमीटर इतक्या पावसाची
नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीपेक्षा ११४ टक्के इतका झाला आहे. सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती, प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी: नागपूर प्रादेशिक वेध शाळेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, ८ तासाच्या कालावधी नागपूर शहरात १४९.३ मिलिमीटर इतके पर्जन्यमान झाले आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये १३९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कामठीमध्ये १०३ मिलिमीटर, हिंगणात १९२.९ मिलिमीटर, रामटेक ७.५ मिलिमीटर, पारशिवणी
५१.२ मिलिमीटर, मौदा ४४ मिलिमीटर, काटोल १५.७ मिलिमीटर, नरखेड-३.२, सावनेर ७.७, कळमेश्वर १३.३, उमरेड ११५, भिवापूर ४६ आणि कुही तालुक्यात ९४.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.