नागपूर -आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त नागपूर महापालिकेतील बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी सायकलची स्वारी करत कार्यालयात दाखल झाले होते. सर्व कर्मचारी आणि अधिकारी आकाशवाणी चौकात एकत्रित आले आणि तेथून महापालिकेत पोहोचले. नागपुरात वायू प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेने हा उपक्रम राबवला होता.
नागपुरात वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोणातून हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या नागरिकांमध्ये सायकलिंगचे क्रेज वाढले आहे. नागरिकांनी सायकलिंगचा उपयोग आता ऑफिससह इतर कामांसाठी केल्यास याचे चांगले परिमाण दिसून येतील. सायकलने कार्यालयात आल्यावर प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, तसेच आरोग्य पण उत्तम राहिल. या पुढे दर महिन्याला किमान एक दिवस तरी मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकलने यावे, असे आवाहन नागपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी केले.