नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी काही मिनिटांच्या अंतरात सलग तीन धमकीचे फोन आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ दखल घेत या प्रकरणात चौकशीला सुरूवात केली आहे. दरम्यान, आज नागपूर पोलिसांचे पथक आज बेळगावात दाखल झाले तर दुसरीकडे बंगलोरमधील ज्या तरूणीचे नाव या प्रकरणात समोर आले आहे, त्या तरूणीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. ती तरूणी सध्या बंगलोरमध्ये खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे.
धमकी प्रकरणात बंगलोर कनेक्शन? :नागपूर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, प्राथमिक तपासात त्या तरुणीचा सहभाग दिसून येत नसल्याने अद्याप तीला ताब्यात घेण्यात आलेले नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात खंडणी मागणारे धमकीचे तीन फोन आल्यानंतर नागपूर पोलीस ऍक्शन मोडवर आली आहे. खंडणी प्रकरणात आरोपीचा शोध घेतला असता तपास पुन्हा बेळगावच्या तुरुंगापर्यंत जाऊन पोहचला आहे. त्याचबरोबर याप्रकरणात बंगलोर कनेक्शन आले समोर आले असून पोलीस त्या मुलीची चौकशी करत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.
काय आहे प्रकरण :मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी काही मिनिटांच्या अंतरात सलग तीन धमकीचे फोन आले होते. जयेश कांथा उर्फ पुजारी नावाने धमकीचे फोन कॉल आले असता यावेळी आरोपीने १० कोटीची खंडणी मागितली. बंगलोर येथील एका तरुणीच्या मोबाईल क्रमांकावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन कॉल करण्यात आले. ज्या तरुणीच्या मोबाईलवरून फोन आल्याचे उघड झाले आहे त्या तरूणीने फोन केला नसला तरी त्या तरुणीचा एक मित्र जयेश कांथा उर्फ पुजारी ज्या कारागृहात बंद असलेल्या कारागृहात कैद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले असून त्या अनुषंगानं तपास करण्यात येत आहे.