नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहराच्या सीमेवरील भीवसन खोरीसह अन्य ठिकाणी अवैध दारू विक्रीच्या अड्यांवर छापे टाकण्यात आले. यात 4 लाख 38 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा-रेल्वेबाबतच्या सर्व तक्रारींसह मदतीकरता 'हा' असणार एकच क्रमांक
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली. या अंतर्गत शहरातील भीवसन खोरी आणि इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेसत्र राबवण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी दारू जमिनीत पुरून ठेवली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत रसायनाने भरलेले 200 लिटर क्षमतेचे 35 प्लास्टिक आणि 42 लोखंडी बॅरेल, 35 लिटर क्षमतेचे 130 प्लास्टिक ड्रम दारूसाठा नष्ट केला. तसेच 200 लिटर क्षमतेचे 15, 35 लिटर क्षमतेचे 10 बॅरेल तर 10 लिटर क्षमतेचे 12 प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले आहेत.