नागपूर -राज्यात पक्षीसप्ताहाला सुरवात झाली आहे. या निमित्ताने नागपूर वनविभागाने पक्षी तस्करांकडून जप्त केलेल्या २६ पोपटांची मुक्तता करत पक्षीसप्ताहाचा उद्देश साध्य करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. ज्यावेळी पोपटांची पिंजऱ्यातून सुटका करण्यात आली. त्यावेळी पोपटाने आकाशी उंच भरारी घेतल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळाले.
दोन दिवसांपूर्वी वनविभागाने पक्षीमित्रांच्या मदतीने नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा आणि कळमेश्वर वनपरिक्षेत्रच्या जंगलातून पकडण्यात आलेले पोपट लकडगंज आणि मोतीबाग परिसरात छापे टाकून जप्त केले होते. त्यावेळी वनविभागाने आरोपी शेख आबीद नासीर खान आणि रुख्साना बेगम यांच्याजवळून २६ पोपट, ९ कबुतर आणि मोठ्या प्रमाणात पिंजरे देखील जप्त केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ४८-अ, ५०, ५१ कार्यवाही करण्यात आली आहे. या दरम्यान या पोपटांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडणे हा प्राधान्यक्रम असल्याने त्या संदर्भात वनविभागाने विशेष प्रयत्न करून त्यासंदर्भात परवानगी देखील मिळवली आहे. त्यानंतर सर्व २६ पोपटांची सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचा- 'या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे': सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बनवले रेल्वेचे घर
पोपटांची तस्करी, विक्री प्रतिबंधित
वन्यपक्षी पोपट हा भारतीय संरक्षण १९७२ चे अनुसूची- IV Sr. NO.50 मध्ये समाविष्ट असून पोपटाची अवैधपणे खरेदी-विक्री व वाहतुकीस कायद्यानुसार प्रतिबंध आहे. मात्र, हे दोन्ही आरोपी गेल्या काही काळापासून पोपटांसह जंगली पक्षांची विक्री आणि तस्करीच्या कामात गुंतलेले आहे. पशुप्रेमींनी या संदर्भात वनविभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने पशु प्रेमींच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षीसप्ताह
पक्षी हा निसर्गाच्या जैविक साखळी व जैवविविधतेतील महत्वाचा घटक आहे. त्या अनुषंगाने पक्षांबाबत जनसामान्यामध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी राज्यात पहिल्यांदाच पक्षी सप्ताह साजरा केला जातो आहे. राज्यात दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षीसप्ताह साजरा केला जात आहे. अरण्यऋषी मारुती चित्तमपली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबर व पक्षी अभ्यास शास्त्रज्ञ, पद्यभुषण (स्व.) डॉ. सलीम अली याची जयंती १२ नोव्हेंबरला असतो. या दिवसांचे औचीत्य साधून हा पक्षीसप्ताह साजरा करण्यात येत आहे.
हेही वाचा- 'चार भिंतीच्या आत SC/ST वर अपमानजनक टिप्पणी, हा गुन्हा नाही'