नागपूर - राज्य सरकारने रक्तदान करण्याबाबत केलेल्या आवाहनाला नागपूर पोलिसांनी प्रतिसाद देत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. 600 पेक्षा जास्त नागपूरकरांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी 'कोरोना योद्धा व्हावे' असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागपूर पोलीस जिमखाना येथे हे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतांश रुग्णालयांमधे रक्ताचा तुटवडा भासत आहे. आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांनी रक्तदान केल्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. मात्र, नागपुरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांकडून रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत रक्तदान करुन सहभावी व्हा, असा संदेश पोलिसांनी दिला आहे.
पोलीस जिमखाना येथे थर्मल स्क्रिनींग आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये पोलीस दलाच्या अनेक जवानांनी रक्तदान केले. शिवाय तब्बल ६०० सर्वसामान्य नागरिकांनी देखील या रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या नागरिक व पोलीस दलातील व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.