नागपूर- ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ५९२ तळीरामांवर नागपूर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. तर इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर रस्त्यावर उतरले होते. यात अनेकांनी नव वर्षाचा उत्सव शांततेत साजरा केला. मात्र, यात अनेक असेही होते ज्यांनी रस्त्यावर दारू पिऊन वाहन चालविण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांचे आवाहन झुगारून त्यांनी नियमांचे उल्लंघन केले. अश्या ५९२ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आणि वाहन जप्त केले आहे. तर, इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५०० जणांवरसुद्धा कारवाई करण्यात आली असून एकूण १ हजार ९२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.