नागपूर -दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एमआयडीसी आऊटर रिंगरोडवर इंडियन आईल विद्यासर्वो या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींनी झोपेत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला होता, तर दुसरा कर्मचारी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात पाच आरोपींना अटक केली आहे.
सागर बावरी नावाचा कुख्यात गुंड आणि त्याचा साथीदारांचे हे कृत्य असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, मात्र मुख्य आरोपी सागर बावरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याशिवाय त्याने पेट्रोल पंप येथून एक लाख रुपये चोरून नेल्याची माहिती पुढे आली आहे.