महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वनिधीतून लस खरेदीच्या परवानगीसाठी नागपूर मनपाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. ठिकठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत आहे. स्वत:च्या निधीतून लस खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र मनपाने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

Nagpur municipal Corporation letter to CM
नागपूर मनपा मुख्यमंत्री पत्र

By

Published : May 7, 2021, 10:43 AM IST

नागपूर -उपराजधानीत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे लस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अशा स्थितीत लस हेच मोठे शस्त्र असून तिस-या लाटेपूर्वी नागपूर शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्या व्यतिरिक्त नागपूर महानगरपालिका स्वनिधीतून लस खरेदी करण्यास तयार आहे. त्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

स्वनिधीतून लस खरेदीच्या परवानगीसाठी नागपूर मनपाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे

१० कोटी निधी खर्च करण्यास तयार -

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून ती दुस-या लाटेपेक्षाही घातक असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अशा स्थितीत सुरक्षेसाठी लस अत्यंत आवश्यक असून नागपूरकर जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाने महत्वाचे पाउल उचलले आहे. तिस-या लाटेपूर्वी शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणा-या लसींशिवाय मनपाची स्वनिधीतून लस खरेदी करण्याची तयारी आहे. त्यासाठी परवानगी दिल्यास नागपूर शहरातील लसीकरणाला गती प्रदान होईल व सर्व नागपूरकरांचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर महानगरपालिका १० कोटी निधी खर्च करण्यास तयार असून पुढे सुद्धा आणखी निधीची व्यवस्था केली जाईल, असे पत्रात नमूद केले असल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

लसीकरणासाठी महापौर सहाय्यता निधीत मानधन द्या -

संपूर्ण नागपूरकरांचे सुरळीत लसीकरण व्हावे यासाठी लस खरेदीला लागणाऱ्या निधीच्या संकलनासाठी शहरातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवकांना विनंती करण्यात आली असल्याचे सुद्धा महापौरांनी सांगितले. शहरातील सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विकास निधीतून १० लाख रुपये तसेच इच्छूक नगरसेवकांनी आपल्या मानधनातील काही निधी लस खरेदी करण्यासाठी ‘महापौर सहायता निधी’मध्ये देण्यासाठी पत्र द्यावे. सर्व नगरसेवकांनी स्वेच्छेने विकास निधी अथवा अन्य निधीमधून १० लक्ष रूपये दिल्यास लस खरेदी करण्यासाठी मनपाकडे १५ कोटी रुपयांची व्यवस्था होईल. याशिवाय शहरातील सर्व खासदारानी त्यांच्या खासदार निधीतून रुपये दोन कोटी तर आमदारांनी आमदार निधीतून रुपये एक कोटीचे सहकार्य करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. शहरातील सर्व खासदार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांनी निधी दिल्यास त्यातून पुन्हा १५ कोटी रुपयांची व्यवस्था होऊ शकेल. सगळी निधी मिळून १० लाख लोकांच्या लसीकरणाची व्यवस्था नागपूर महानगरपालिका करू शकणार आहे. याशिवाय नागपूर शहरातील उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींनी त्याचा सीएसआर निधी लस खरेदी करण्यासाठी द्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे

ABOUT THE AUTHOR

...view details