नागपूर - शहरातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या जे. पी. इंटरप्रायजेस या कंपनीच्या ठेकेदाराला एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना एकूण कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख ११ हजार ९६५ रुपये दंडही ठोठावला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.
तुकाराम मुंढेंची धडक कारवाई, कामात दिरंगाई करणारा ठेकेदार टाकला काळ्या यादीत
नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. त्यांनी सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
नागपूर मनपाच्या इतिहासात ठेकेदाराविरोधात पहिल्यांदाच अशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी मनपा आयुक्तांनी क्वालिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनियर्स प्रा. लि. आणि मनपाचे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा ३ मधील रस्ता क्रमांक ३१ म्हणजेचे एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी रस्त्याचे पेव्हर ब्लॉक मानकाप्रमाण आवश्यक ग्रेडनुसार नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात आढळून आले. प्रत्यक्षात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे काँक्रीटीकरण पक्के होण्याच्या आधीच लावण्यात सुरुवात केली असल्याचे निदर्शनास आले होते. जे. पी. इंटरप्रायजेसने केलेल्या कामाच्या मोबदल्यात मनपाने ठेकेदाराला ३२ कोटी ४७ लाख ८६ हजार १५१ रुपये दिलेले आहेत. मात्र, कामात त्रुटी आढळल्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकत कार्यादेशाच्या रकमेवर ०.२५ टक्के दंड ठोठावला आहे.