नागपूर - सभात्याग केल्याच्या मुद्यावर नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपले मौन सोडले आहे. महापालिकेच्या सभेत काही सदस्यांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप करत माझे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व प्रकार महापौरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणताच आक्षेप घेतला नाही. तसेच त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे सभात्याग करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा खुलासा मनपा आयुक्त मुंढे यांनी केला आहे.
सभात्याग का केला? याबाबत स्पष्टीकरण देताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे राज्य सरकारच्या परवानगीनंतर दोन दिवसांपूर्वी नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. त्या सभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच इमारतीच्या बांधकामाच्या वापराबद्दलचा प्रश्न काँग्रेसच्या नगरसेवकाने उपस्थिती केला. त्यावरून संघर्षाला सुरुवात झाली आणि मुंढे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली. त्यावरून मुंढे आक्षेप घेत सभागृहातून निघून गेले होते. त्यामुळे ती सभा गाजली होती. या प्रकरणावर तुकाराम मुंढे यांनी आपले मौन सोडले आहे.
सभा सुरू असताना माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचे ते म्हणाले. त्या सभेमध्ये माझी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सभेमध्ये वैयक्तिक टीका होत असताना ते महापौर यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. केटी नगरातील कोविड सेंटर संदर्भात प्रश्न आल्यानंतर त्यावर उत्तर देत असताना भाजपाचे जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर वैयक्तिक शेरेबाजी करण्यात आली. तुम्ही हिटलर आहात, तुम्ही इंग्रजांपेक्षा जास्त जुलमी आहेत, तुमचे नाव जरी तुकाराम असले तरी तुम्ही तुकारामांच्या नावाला कलंक आहात, असा शब्दप्रयोग करण्यात आला. त्यानंतर सभात्याग केला असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
सभेमध्ये शिष्टाचार पाळण्याची जबाबदारी महापौरांची असते. वैयक्तिक टीका सुरू असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब वेळोवेळी आणून दिली असताना देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा सदस्यांना तंबी दिली नाही. पालिकेच्या सभेत अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी होत असताना देखील महापौर गप्पा होते, असा आरोप मुंढे यांनी केला. तसेच यापुढे असला प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.