नागपूर : नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या ६६ कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही विभागांना आकस्मिक भेट दिली. यावेळी, काही कर्मचारी उशिरा आल्याचे आणि काही कर्मचारी विनामंजुरी सुटीवर असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. रुजू झाल्यानंतर मनपातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयातील काही विभागांना आकस्मिक भेट देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरुन संबंधित अधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयातील वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाची पाहणी केली. या आकस्मिक पाहणीत या विभागातील काही कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर झाले नसल्याचे निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर काही कर्मचारी रजेवर होते. चौकशी केली असता त्यांनी रजेचा कुठलाही अर्ज दिलेला नव्हता अथवा त्यांच्या रजेला पूर्वपरवानगी नव्हती. अशा कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६६ होती. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून त्या सर्व ६६ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश दिले.