नागपूर :तब्बल दहा ते बारा दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारत पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अचानकपणे पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा निर्माण झाला आहे. यामुळे भर पावसाळ्यात घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तर दुसरीकडे पावसाअभावी थोड्या काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत. या संदर्भात प्रादेशिक हवामान विभागाकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की आणखी दोन ते तीन दिवस पाऊस येण्याची शक्यता नाही. मात्र ९ जुलैपासून पावसाकरिता पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम.एल. साहू यांनी दिली आहे.
मध्य भारतासह विदर्भात पाऊस पडण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे गरजेचे आहे, त्यानंतरच विदर्भात चांगला पाऊस अपेक्षित असतो. मात्र गेल्या महिन्यात विदर्भात निर्धारित वेळेच्या तब्बल ८ दिवस आधी मान्सून दाखल झाल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली होती. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानकपणे बेपत्ता झालेला पाऊस अजूनही परत आलेला नाही, ज्यामुळे वातावरणात दमटपणा वाढलेला आहे. पावसाअभावी तापमान जरी फार वाढलेलं नसलं, तरी कामानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांना उकाडा असह्य होऊ लागला आहे. तर दुसरीकडे पावसाअभावी विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचे पुनरागमन होण्याची भविष्यवाणी प्रादेशिक हवामान विभागाने केली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.