नागपूर- शहरात कालपासून (9 ऑगस्ट) पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे अनेक तक्रारी किंवा मदतीसाठी कॉल्स येऊ शकतात. हे ओळखून नागरिकांच्या कॉल्सची वाट न बघता ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ च्या माध्यमातून समोर आलेल्या समस्या तातडीने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी बोलून सोडवायच्या, अशी प्रणाली मनपा मुख्यालयात सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, काल मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अचानक 'इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर' गाठले आणि शहरातील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्क्रिनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली ती तातडीने सोडविण्यासाठी त्यांनी स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधला व समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.
कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याशी बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालयात 'अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर' उभारण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या ३ हजार ६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसह प्रसंगी उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीवर कॅमेऱ्यांवद्वारे लक्ष ठेवले जात आहे.
शहरात काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जर पाऊस मुसळधार आला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे ओळखून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर गाठायला लावले. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी समस्या दिसून येत आहे, त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.
नागरिकांच्या कॉल्सची वाट न बघता उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. याव्यतिरिक्त आपतकालीन विभाग नियंत्रण कक्षही सध्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्येच हलविण्यात आला आहे. येथे नागरिकांचे कॉल्स येताच उपस्थित अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रथम मिळालेल्या माहितीची खातरजमा केली जाते. त्यानंतर तातडीने तेथे यंत्रणा पाठविली जाते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ला स्वत: भेट देऊन तेथे उपस्थित कर्मचाऱ्याशीही संवाद साधला. तक्रारींचे स्वरूप, त्यावर होणारी कार्यवाही, नागरिकांचे समाधान होत आहे अथवा नाही आदींबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. लाईव्ह फुटेजवरून ज्या ठिकाणी समस्या दिसली तेथे तातडीने संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना पाठविले. त्या कर्मचाऱ्याशी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मोबाईलवरून संपर्क साधत परिस्थिती जाणून घेतली. पुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी काय करायला हवे, याबाबत त्यांनी त्या कर्मचाऱ्याकडूनच माहिती घेत त्याप्रमाणे कार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
लॉकडाऊनच्या काळात शहरात झालेल्या स्वच्छता अभियानात नदी, नाले आणि पावसाळी नाल्यांची मोठ्या प्रमाणात सफाई करण्यात आली. त्यामुळे, काल आलेल्या पावसामुळे पाण्याचा सहजतेने निचरा होण्यास मदत झाली. पावसाळी नाल्यांच्या सफाईमुळे शहरात पाणी जमा झाल्याच्या कमी तक्रारी प्राप्त झाल्या. रस्त्यावर पाणी जमा न झाल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला नाही. दुसरीकडे नाग, पिली व पोहरा या तीनही नद्यांची स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे पाणी सहजतेने वाहून गेले. त्यामुळे, सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला नाही. शहरातील आपात्कालीन परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी मनपाद्वारे झोन स्तरावर विविध टीम गठीत करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-कौटुंबिक वाद आणि कर्जामुळे त्रस्त युवक चढला टॉवरवर; 4 तासांच्या प्रयत्नांनंतर खाली उतरवण्यात यश