नागपूर :नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात महामेट्रोकडून तिकीट दरांमध्ये मोठी सवलत दिलेली होती. मात्र, आता सवलत बंद करण्यात आल्यामुळे तिकिटांचे दर पूर्ववत झाले आहेत. दरम्यानच्या, काळात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या संख्येत मोठी घट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महामेट्रो कडून सवलतीच्या दरात तिकिटांची विक्री सुरू करण्यात आली होती. आता 15 किलोमीटर पेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी 20 ऐवजी 35 रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे.
मेट्रोला मोठ्या प्रमाणात पसंती : इंधन दरवाढीची झळ सर्वांनाचं बसल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजेच आपली बसचे तिकीट वाढले असल्याने नागपूरकरांनी मेट्रोच्या प्रवासाला सुरुवात केली होती. केवळ 5 आणि 10 रुपयांमध्ये वातानुकूलित प्रवास होत असल्याने प्रवाशांनी मेट्रोच्या प्रवासाला भरभरून प्रतिसाद दिला. दिवसभरात एक लाखांपेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवास करत आहेत. सवलतीच्या दरात प्रवास आणि वेळेची बचत म्हणून देखील मेट्रो नागपूरकरांच्या पसंतीला उतरली आहे.
नागपूर मेट्रोचे नवीन तिकीट दर : नागपूर मेट्रोने सवलतीच्या दरात तिकीट सेवा सुरू केल्यानंतर कमीत कमी पाच रुपये आणि जास्तीत जास्त दहा रुपये तिकीट दर आकारले जात होते. मात्र, आता तिकीटदरांची सवलत काढल्यानंतर १ ते सहा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी सहा रुपयांचे तिकीट काढावे लागेल. तर ६ ते ९ किलोमीटर अंतरासाठी दहा रुपयांचे तिकीट लागेल. ९ ते १२ किलोमीटर प्रवासासाठी १५ आणि १२ ते १५ किलोमीटर अंतराच्या प्रवासाला २० रुपयांचे तिकीट लागणार आहे. १५ पेक्षा अधिक किलोमीटर अंतरासाठी सर्वाधिक ३५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. दरम्यान, खापरी ते ऑटोमोटिव्ह स्टेशन पर्यत ३५ रुपये खर्च येईल पूर्वी एवढ्याचं प्रवासासाठी केवळ २० रुपये खर्च येत होता.