नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या एमबीए अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, विद्यापीठ प्रशासनाकडून निर्णय घेत प्रवेश प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी कक्षाद्वारे प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून 14 डिसेंबरपर्यत प्रवेशासाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे एमबीए करू पाहणाऱ्या विद्यार्थांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
कोरोनामुळे राज्यातील जवळजवळ सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. त्यानंतर हळूहळू आता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. नागपूर विद्यापीठाकडूनदेखील एमबीए प्रवेशाला सुरुवात झाली आहे. त्याकरिता अर्ज नोंदणीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल 23 जूनला जाहीर करण्यात आला. मात्र, कोरोनामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने एमबीएच्या प्रवेशालाही विलंब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच रखडली होती.
पात्र विद्यार्थ्यांची संख्या -
प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून पात्र विद्यार्थांची संख्या मोठी आहे. एमबीएसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 10 हजार इतकी आहे. शिवाय, एमबीएसाठी सद्यस्थितीत जागा फक्त 34 हजार 300 च्या घरात आहेत.