नागपूर -शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ ते २१ मार्चदरम्यान कडक संचारबंदी लावण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घोषि केला. मात्र, या निर्णयानंतर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात देखील मला या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले नसल्याचा गंभीर आरोप महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. हा माझ्यासोबतच संपूर्ण नागपूरच्या जनतेचा अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शहरात संचारबंदी लावण्याचा अधिकार हा महानगरपालिका आयुक्तांना असतानासुद्धा पालकमंत्री नितीन राऊत यांनी हा निर्णय जाहीर केला असल्याचा आरोप महापौर तिवारी यांनी केला.
महापौर याबाबत माध्यमांशी संवाद साधताना. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर काल (गुरुवारी) विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री राऊत यांनी 15 ते 21 मार्च दरम्यान नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येत असलेल्या भागांमध्ये संचारबंदी लावण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयावर राजकारण रंगायलाही सुरुवात झाली आहे. पालकमंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयाविरोधात भाजपकडून टीका करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेण्याआधी गोरगरीब जनतेचा विचार केला का?, कामधंदे बंद झाल्याने हजारो लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मग त्यांची काय सोय केली? असा प्रश्न भाजप आणि महापौरांकडून उपस्थित केले जात आहेत. हेही वाचा -सरकारविरोधात तरुणांची माथी भडकवून आगीत तेल ओतण्याचे बंद करा, राऊत यांचा विरोधकांना टोला
हा तर शहरातील प्रत्येक नागरिकाचा अपमान -
काल झालेल्या बैठकीत शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला बोलावणे अपेक्षित होते. मात्र, पालकमंत्र्यांनी यांनी यामध्ये राजकारण केल्याने मला बैठकीचे निमंत्रण मिळाले नाही. मला जर बैठकीत बोलावले असते तर मी नागपुरच्या हिताच्या निर्णयाला समर्थन दिले असते. मात्र, मला बाजूला सारून पालकमंत्री राऊत यांनी केवळ महापौर पदाचाच अपमान केलेला नाही. तर हा नागपुरच्या प्रत्येक नागरिकांचा अपमान असल्याचे ते म्हणाले आहेत. शहरात संचारबंदी लावण्याचा अधिकार हा महानगरपालिका आयुक्तांना असताना सुद्धा पालकमंत्री नितीन राऊत यांनी हा निर्णय जाहीर केला असला तरी आम्ही त्यांच्या निर्णयाचा मान राखणार असल्याची प्रतिक्रिया महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.
हेही वाचा -...तर नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागेल - चव्हाण