नागपूर - उपराजधानी नागपूरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहे. हे निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचे आवाहन महापौर आणि पालिका आयुक्तांनी केले आहे.
नागपूर महापौर आणि मनपा आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका -
नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना उद्देशून नियम पाळण्याचे आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. एक कोरोनाबाधीत व्यक्ती गर्दीत गेला तर २५ व्यक्तींना त्याचा संसर्ग होऊ शकतो. अर्थात आपल्यामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात टाकणे योग्य नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळावे, वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन दयाशंकर तिवारी म्हणाले. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. घरी राहून मनपा प्रशासनाला सहकार्य करा. नागरिक व प्रशासनाने मिळून काम केले तर आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो, असेही महापौर म्हणाले.
कारवाई हा उपाय नाही -
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असावी यासाठी मनपा प्रशासन कठोर पावले उचलत आहे. मनपाची उपद्रव शोध पथकाचे चमू दिवस-रात्र नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहे. मात्र, कारवाई हा त्यावरील उपाय नसून नियम पाळणे आणि संसर्ग टाळणे अत्यावश्यक आहे. यासाठी काही नियम कडक केले आहेत. शनिवार आणि रविवारी कुणीही घराबाहेर निघू नये, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दुकाने, मॉल, बाजार, थिएटर, नाट्यगृह, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरेंट, सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये, मनपाचे कत्तलखाने, शहरातील मांस विक्रीची दुकाने सुरू राहणार नाहीत. नागरिकांनीही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. कुटुंबासोबत दिवस घालवावा आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आयुक्तांनी सांगितले.