नागपूर - राज्यातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून नागपूरकडे बघितले जात आहे. गेल्या मार्च महिन्यापासून नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने अनेक उपाय योजना केल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. नागपूर प्रमाणेच कोरोनाची भीषण परिस्थिती आता राज्यातील सर्वच जिल्ह्यात निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवार आणि रविवारी उपराजधानी नागपूरात कडक लॉक-डाऊन लावण्यात आला आहे. त्यानुसार आज शनिवार आणि उद्या (रविवार) शहरात बंद पाळण्यात येत आहे. ४८ तासांचा हा बंद असला तरी पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाचे वेगळे निर्बंध लागू केलेले नाहीत.
नागपूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती
नागपूर शहराची आणि जिल्ह्याची परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे. शहरातील प्रत्येक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे रुग्णासंख्या झपाट्याने वाढत आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यात देखील आहे. नागपूर जिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यांपैकी सावनेर, काटोल, हिंगणा, कळमेश्वर आणि कामठी तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असल्याने हे तालुके डेंजर झोनमध्ये आलेले आहेत. तर उर्वरित तालुक्यातसुद्धा रुग्णसंख्या वाढत आहेत. दर दिवसाला सरासरी अडीच ते तीन हजार रुग्ण रोज बाधित होत असल्याने धोका वाढला आहे.
जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूची स्थिती
यावर्षीच्या सुरुवातीलाच नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरवात झाली होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने प्रचंड वेग धरला होता. एप्रिल महिनाच्या सुरवातीला कोरोनाची रुग्ण संख्या हाताबाहेर गेली आहे. केवळ रुग्णसंख्या नाही तर मृत्यूचे आकडे देखील धक्कादायक वाढत आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४९ हजार ३४७ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये शहरात ३२ हजार ५९७ तर ग्रामीण भागात १६ हजार ७५० रुग्ण सक्रिय आहेत. गेल्या आठवड्यात हीच रुग्ण संख्या ३७ हजार इतकी होती. त्यामुळे आता रुग्णांना खासगी आणि शासकीय रुग्णालयात बेड्स मिळणेही कठीण झाले आहे. एप्रिल महिन्याच्या ९ दिवसात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता नागपूर मध्ये ५ हजार ६४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दर २.४ इतका झाला आहे तर पॉझिटिव्ह रुग्ण होण्याचा दर 22 ते 23 टक्के आहे