नागपूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद पदवीधर निवडणूक होत असल्याने प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असे नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. मतदारांनी मतदान केंद्रावर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मतदान करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
पदवीधर मतदान प्रक्रिया पार पाडत असताना प्रशासनाकडून विविध नियमे आखून देण्यात आले आहेत. यासाठी मतदारांनी मतदान कसे करावे, कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. उद्या होणाऱ्या निवडणूकीसाठी प्रशासन स्तरावर पूर्ण खबरदारी घेत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 164 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहीती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय या मतदान केंद्रासाठी स्वतंत्र अधिकारी यांच्या समवेशत पोलीस देखील तैनात करण्यात आल्याचेही रविंद्र ठाकरे यांनी सांगितले आहे.