नागपूर: नागपूर सायबर पोलिसांनी "टास्क फ्रॉड" चा पर्दाफाश केला आहे. या टास्क फ्रॉडचा संबंध थेट चीनच्या मनी ट्रेलशी आहे. याप्रकरणात पोलिसांनी मुंबई, गुजरात आणि राजस्थानमधील सहा जणांना अटक केली आहे. क्रिप्टोकरन्सीद्वारे चिनी व्यक्तीला गुन्ह्यांचे पैसे हस्तांतरित केल्याचा व्यवहार पोलिसांनी उघडकीस आणला, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींपैकी 3 जण मुंबई आणि उपनगरीय नालासोपारा येथील आहेत. तर इतर राजस्थान आणि सुरत येथील आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 19 डेबिट आणि क्रेडिट कार्ड, 9 मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि 7.87 लाख रुपयांची रोकड जप्त केली. यासह या आरोपी व्यक्तींच्या बँक खात्यातील 37.26 लाख रुपये गोठवले असल्याचेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहे टास्क फ्रॉड : आरोपींना अटक केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतना पोलीस उपायुक्त अर्चित चांडक म्हणाले की, टास्क फ्रॉड ही गुन्हेगारांद्वारे निर्माण केलेली एक नवी पद्धत आहे. ही कॉर्पोरेट संस्थाप्रमाणे कार्य करते. फसवणूक करण्यासाठी विविध नियुक्ता केल्या जातात. टास्क फ्रॉड फसवणूक करणारे विविध कार्ये करण्यासाठी टीम नियुक्त करत असतात. व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी आयटी टीम काम करते. तर काही व्यावसायिक बँकरही यात काम करतात. चांडक म्हणाले की, फसवणूक करणारे तीन पायऱ्यावर काम करतात.
जाणून घ्या फसवणुकीची पद्धत:पहिली पायरी म्हणजे ट्रस्ट बिल्डिंग यात लोकांना सोशल मीडियावरील प्रोफाईलला लाईक, शेअर केल्यानंतर पैसे देण्याचे आमिष दाखवले जाते. त्यावर समोरील व्यक्तीने विश्वास ठेवला की, फसवणूक करणारे त्यांना काही आर्थिक बक्षिसे देतात. त्यानंतर अजून जास्त पैसे मिळवण्याचे असतील फसवणूक करणारे त्या व्यक्तींकडून पैसे मागतात. अधिक मोबदला मिळेल या आशेने अनेकजण पैसे देतात. आपली फसवणूक झाल्याचे समोरील व्यक्तीला कळेपर्यंत एक मोठी रक्कम फसवणूक करणाऱ्याकडे गेलेली असते. त्यानंतर नंबर ब्लॉक करुन व्यक्तीला गंडा घातला जातो. हे टास्क फ्रॉड तीन पायऱ्यावर काम करते. आधी आमिष देऊन युझरला आपल्याकडे आणतात. दुसरी पायरी त्या व्यक्तीचा विश्वास संपादन केला जातो. तिसरी पायरी म्हणजे फसवणूक असते.