नागपूर Nagpur Crime:हॉटेल मालकाच्या हत्येचा तपास सुरू असताना नागपूर पोलिसांनी बंदूक तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तहसील पोलिसांनी मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एका तस्कराला, तर नागपुरातून एका तस्कराला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण नऊ पिस्तुल जप्त केल्या आहेत. याशिवाय 84 जिवंत काडतुसंही पोलिसांनी जप्त केली आहेत. मुख्य आरोपीचं नाव इमरान आलम असून दुसऱ्या आरोपीचं नाव फिरोज खान असं आहे.
आरोपींना ठोकल्या बेड्या : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमीनपुरा येथील अल्करीम गेस्ट हाऊसचे मालक जमील अहमद यांची गेल्या महिन्याच्या 25 तारखेला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी मोहम्मद परवेज मोहम्मद हारूनसह त्याच्या साथीदारांना अटक केली.
बंदूक तस्करी उघड : जमील अहमदची हत्या करताना आरोपींनी वापरलेली बंदूक कुठून खरेदी केली याचा तपास पोलीस करत होते. तेव्हा मोहम्मद परवेझ मोहम्मद हारून यानं फिरोज खान नावाच्या तस्कराकडून पिस्तुल विकत घेतल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी फिरोज खानला अटक करून मध्य प्रदेशातील बालाघाट येथे चौकशी केली. तेव्हा आरोपीनं इम्रान आलम नावाच्या आरोपीचं नाव पोलिसांना सांगितलं.