नागपूर : पॉक्सोच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका गतिमंद कैद्यावर कारागृहातील दुसऱ्या आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Crime News) घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूर मध्यवर्ती कारागृह गैरप्रकारांसाठी चर्चेत आले आहे.
सुनावणी दरम्यान हा प्रकार समोर : पॉक्सो न्यायालयात आरोपीची सुनावणी सुरू होती. त्यावेळी गतिमंद आरोपीने न्यायालयात सुनावणी दरम्यान अत्याचार झाल्याची माहिती न्यायमूर्तीना सांगितली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोहन बहुरिदास असे आरोपीचे नाव आहे. धंतोली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाईल, त्यानंतर न्यायालय याप्रकरणी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तपास करण्याचे दिले आदेश : गतिमंद आरोपीने त्याच्यावर कारागृहाच्या आत झालेल्या अत्याचाराची घटना न्यायाधीशांसमोर सांगितल्यानंतर, न्यायालयातील सर्व स्तब्ध झाले होते. न्यायमूर्ती पी.जयस्वाल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तात्काळ धंतोली पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित कैद्याची वैद्यकीय तपासणी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. तसेच कारागृह प्रशासनाला पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गतिमंद आरोपीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव रोहन बहुरिदास असे आहे. त्याचा एका बलात्काराच्या प्रकरणात आरोप सिद्ध असून, त्याला दहा वर्षाची शिक्षा झालेली आहे.