नागपूर -कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आज(सोमवार)पासून नागपुरात सात दिवसीय संचारबंदी सुरू झाली आहे. संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर असल्याने सकाळ पासूनच शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे देखील रस्त्यावर उतरले. संचारबंदीचा आज पहिला दिवस असल्याने काही सूट नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, यापुढे संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
आज(सोमवार)पासून नागपूर शहरात कडक संचारबंदीला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने आज शहर पोलीस आयुक्तांनी संपूर्ण शहराचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी शहरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीवर समाधान व्यक्त केले आहे. व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद केली असली तरी, काही व्यापारी संघटनांनी संचारबंदीला विरोध केला आहे. यावर पोलीस आयुक्तांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई -
गेल्या काही दिवसांपासून शहर पोलीस आणि महानगरपालिकेच्या 'उपद्रव शोध' पथकाकडून सातत्याने बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी देखील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून कडक नियम लागू करण्यात आले आहे. संचारबंदी दरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. तरी देखील नागरिक नियम आणि कायद्यांना जुमानत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.
बेजबाबदार नागरिकांवर कारवाई सुरू -
संचारबंदी दरम्यान कारण नसताना घराबाहेर पडलेल्या बेजबाबदार नागरिकांवर पोलीसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरात संचारबंदी लागू असताना देखील नागरिक सकाळी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले होते. त्यासाठी अनेकांनी विविध कारणे दिली. या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारणा केली असता आज पहिला दिवस असल्याने सकाळी सूट दिल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र, त्यानंतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.