नागपूर -उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी आज (सोमवारी) काँग्रेसकडून शहरातील संविधान चौकात प्रदर्शन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रदर्शनात शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. मात्र, इतर महत्वाचे नेते गैरहजर होते.
हाथरस प्रकरण : नागपूरमध्ये काँग्रसकडून नोंदविला निषेध - nagpur congress agitation over hathras case
हाथरस प्रकरणाचा निषेध करत नागपूरमध्ये शहर आणि जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज (सोमवारी) आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हाथरस येथे घडलेल्या अमानवीय बलात्काराच्या घटनेविरुद्ध देशभरात संताप आणि चीड व्यक्त होत आहे. अनेक राजकीय पक्षांनी या संदर्भांत आंदोलन केली आहेत. पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीसुद्धा पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत असताना काँग्रेस पक्षाकडून देशभरात आंदोलने केली जात आहेत.
नागपुरातसुद्धा हाथरस घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी योगी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. यावेळी पीडित तरुणीला श्रद्धांजलीही वाहण्यात आली. योगी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरत असल्याने नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केली.