नागपूर- महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या नव्या कोविड रुग्णालयाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. ज्याविरुद्ध स्थानिकांनी विरोध आंदोलन केले.नागरिकांच्या समर्थानात स्थानिक काँग्रेस आमदार विकास ठाकरे उतरले होते. विकास ठाकरे यांनीही नागरिकांच्या मागणीला समर्थन दर्शवत नागपूर महापालिकेचे प्रस्तावित कोविड रुग्णालय तेथून इतरत्र हलवण्याची मागणी केली.
नागपूरच्या काटोल रोडवरील केटी नगर परिसरात महापालिकेचे 105 खाटांचे कोव्हिड रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पुढील 2 आठवड्यात हे रुग्णालय कार्यान्वित करण्यात येण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही बहुमजली इमारत गेल्या 14 वर्षांपासून बनून तयार आहे. गेल्या 2 वर्षांपासून एसआरए (झोपडपट्टी पुनवर्सन) च्या कार्यालयासाठी वापरण्यात येते. परंतु, शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या इमारतीचा वापर महापालिकेच्या कोविड रुग्णालयासाठी करण्याचे योजिले आहे.