नागपूर - भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरचा गड काँग्रेसने उद्ध्वस्त केला आहे. शहरातील सहा पैकी दोन जागी काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपच्या विद्यमान आमदारांना पराभूत करून शहरात काँग्रेसला खाते उघडून दिले आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये देखील भाजपला पराभवाचा धक्का देत काँग्रेसने आपली ताकत वाढली आहे. दरम्यान, सावनेरची जागा अबाधित राखण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. तसेच उमरेड विधानसभा निवडणूक जिंकून काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 6 जागा जिंकून भाजपला 4 जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे. तर काँग्रेसने 4 जागा जिंकल्या आहेत, या शिवाय राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवाराने सुद्धा नागपुरात दमदार विजय संपादन केले आहे.
नागपूर: बालेकिल्ल्यातच भाजपची पीछेहाट; अतिआत्मविश्वास नडल्याची चर्चा
नागपूर विधानसभा निवडणुकांचे निकाल थक्क करणारे आहेत. या निकालानंतर जिल्हाभरात सुरु असलेल्या चर्चांचा आढावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचे वलय असलेल्या नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष चांगलाच बॅकफूटवर फेकला गेला आहे. काही विद्यमान आमदारांवर अविश्वास दाखवणे भाजपला नडल्याचा सूर आता उमटू लागले आहेत. उत्तर नागपूर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विद्यमान आमदार मिलिंद माने यांना मोठ्या मताधिक्याने पराभुत करून पुन्हा आमदारकी मिळवली आहे. या शिवाय पश्चिम नागपूर मतदार संघातून काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सुद्धा अनपेक्षित रित्या विजय मिळवत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विकास ठाकरे यांनी विद्यमान आमदार मिलिंद माने यांना पराभूत केले आहे. जिल्ह्यातही भाजपला मोठा फटका बसला आहे. उमरेड येथील दोन वेळचे आमदार सुधीर पारवे यांना त्यांचे बंधू काँग्रेस उमेदवार राजू पारवे यांनी पराभूत करत पहिल्यांदा विधानसभेत जाण्याचा मान पटकावला आहे. या शिवाय सावनेर विधानसभा मतदार संघ वाचवण्यात काँग्रेसला यश आल्याने जिल्ह्यात काँग्रेसची संख्याबळ 4 वर पोहचली आहे. एकंदरीत नागपूर जिल्ह्यातील निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नागपूर जिल्ह्याला गृहीत धरून भाजपने केलेले दुर्लक्ष त्यांचे पानिपत करण्यासाठी कारणीभूत ठरल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे.
हेही वाचा -साताऱ्यात उदयनराजेंना धक्का, श्रीनिवास पाटलांचा दणदणीत विजय