नागपूर : गावठी झाडपाला लावण्याच्या बहाण्याने घरी येणाऱ्या 63 वर्षीय नराधमाने युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. नराधमाचा अत्याचार अनेकदा सहन करणाऱ्या या पीडितेने एका मुलीला जन्म दिल्यामुळे ही घटना उजेडात आली. मनोहर सखाराम काठोके असं अत्याचारी नराधमाचं नाव आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. कपडे वाळण्यासाठी घालत असताना पीडितेला विजेचा धक्का लागला होता. त्यामुळे तिच्या अधू झालेल्या खांद्यावर आणि हातावर गावठी झाडपाल्याचा लेप लावण्यासाठी नराधम मनोहर काठोके हा पीडितेच्या घरी येत होता.
कपडे वाळवताना पीडितेला लागला होता विजेचा धक्का :पीडिता घरातील कपडे वाळवत असताना विजेचा धक्का लागून तिच्या खांद्याला आणि हाताला मार लागला होता. 2018 साली हा अपघात घडला तेव्हा पीडिता साधारण 15 वर्षांची होती. पीडितेच्या खांद्यावर आणि हातावर 'रामटेक' भागातल्या पाठक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. मात्र, तिच्या आई वडिलांनी तिला गावठी झाडपाल्याचं औषध देण्यासाठी महादुला परिसरात राहणाऱ्या मनोहर सखाराम काठोके याला सांगितलं होतं. मनोहर काठोके डिसेंबर 2019 पासून रोज सकाळी 10 वाजता पीडितेच्या घरी येऊन तिला झाडपाल्याचा लेप लावत होता. झाडपाल्याच्या औषधाने पीडितेला आराम पडत असल्याने तिच्यावर उपचार सुरूच राहिले.
फ्रॅक्चर असल्याने पीडिता हतबल :जानेवारी 2022 मध्ये पीडितेचे आई-वडील नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता कामाला गेले होते. तर तिचे भाऊ आणि बहीण शाळेत गेले होते. त्यादरम्यान मनोहर काठोके हा लेप लावण्यासाठी घरी आला. पीडितेच्या हाताला लेप लावताना त्याने तिला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे', असे सांगितले. यावेळी मनोहर काठोके याने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेचे दोन्ही हात आणि खांदा फ्रॅक्चरअसल्याने ती त्याला विरोध करू शकली नाही. ती जोरात ओरडत असताना नराधमाने तिचे तोंड दाबून 'तू कोणाला सांगशील तर तुला ठार मारून टाकीन', अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेवर तो वारंवार लैंगिक अत्याचार करत राहिला.