नागपूर : शहराला ऐतिहासिक ओळख मिळवून देणाऱ्या नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नाग नदीला नवे जीवन देणा-या ४१ किमी लांबीचा प्रकल्प १ हजार ९२७ कोटीचा अपेक्षित आहे. या प्रकल्पाची पायाभरणी गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी नाग नदी प्रकल्पाचे काम ८ वर्षात पूर्ण होईल असा अंदाज आहे. नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला १९२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च फ्रान्स सरकार करणार आहे.
ऑक्टोबरमध्ये सुरू होणार काम :नागपूर शहराची ओळख असलेल्या नाग नदीत शहरातील सर्व भागातून आलेले गडर लाईनचे पाणी वाहून नेले जात आहे. त्यामुळे नाग नदीने स्वतःचे अस्तित्व हरवत होती. त्यामुळे नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पांतर्गत सर्वात आधी मलनिस्सारण वाहिन्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात सल्लागारांची नियुक्ती केली जाईल. ऑक्टोबर महिन्यात नागनदी सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
1 हजार 927 कोटींचा प्रकल्प : नाग नदी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 927 कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि नागपूर महानगरपालिका यांची भागीदारी असेल. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा हा 60 टक्के असेल तर राज्य सरकार 25 टक्के भार उचलणार आहे, नागपूर महानगरपालिकेला 15 टक्के खर्च करावा लागणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून 1 हजार 115.22 कोटी राज्य शासनाकडून 507.36 कोटी तसेच मनपाकडून 15 टक्के म्हणजे 304.41 कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 131861 घरांना सीवर नेटवर्कमध्ये जोडण्यात येणार आहे.
नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी : नाग नदी प्रदूषण निर्मूलन आणि पुनरूज्जीवन प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगर पालिकेकडे आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपुरकरांसाठी महत्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे.