नागपूर- १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात आणि राज्यात घवघवीत यश मिळाले. त्यानंतर शुक्रवारी १६वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतीकडे करण्यात आली. आता बहुमताने विजयी झालेल्या भाजपच्या नवीन सतेत्त नागपूर लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार नितीन गडकरी यांच्याकडे कोणते मंत्रालय सोपवले जाणार याबाबत जोरदार तर्क वितर्क लढवले जात आहेत. अनेकांच्या मते गडकरींच्या कोणत्याही मंत्रालयात बदल केला जाणार नाही, तर काहींना गडकरींचे प्रमोशन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नवीन सरकार स्थापनेचे वेध लागलेले आहेत. शुक्रवारी केद्रींय कॅबिनेटची बैठक झाली. त्यात १६ वी लोकसभा भंग करण्याचा निर्णय झाला आहे. ३० मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवीन सरकारची स्थापना होणार आहे. मात्र, या नवीन मंत्रिमंडळात कोणत्या खासदारांची वर्णी लागेल यावरून जनमानसात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.