नागपूरच्या पूरस्थितीवर बोलताना विलास मुत्तेमवार आणि नाना पटोले नागपूर Muttemwar Criticized Gadkari Nagpur : शनिवारी मध्यरात्री नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो नागपूरकरांचा संसार हा उघड्यावर पडला आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह नागपूर शहरातील काँग्रेस आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूरच्या नाग नदीत नाव चालवण्याचं स्वप्न नितीन गडकरी यांनी पाहिलं होतं. त्याचा ते अनेक भाषणात उल्लेख देखील करतात. आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचा टोला माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांनी लावला आहे. दरवर्षी नाग नदी व पिवळी नदी साफ केली जाते. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नितीन गडकरी दरवर्षी नाग नदीच्या संदर्भात जपान, फ्रान्स सोबत चर्चा केल्याचं सांगत लोकांना दिव्य स्वप्न दाखवतात. मात्र, प्रत्यक्षात नागपूरकरांच्या नाका-तोंडात पाणी जात असताना या सत्ताधाऱ्यांना काहीही घेणं देणं नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
ग्रामीण भागातून भाजपाचा सुपडा साफ :विकासाच्या नावावर नागपूरला भकास करणाऱ्या या लोकांचा नागपूरकरांना अजिबात विश्वास राहिलेला नाही. भाजपाच्या लोकांनी जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. नागपूर ग्रामीणच्या मतदारसंघातून भाजपाचा सुपडा साफ झाला आहे. म्हणून भाजपा नेत्यांनी पत्रकारांना चहा प्यायला धाब्यावर घेऊन जावे, असा अजब सल्ला दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी :नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. नागपुरातील ही भयावह स्थिती सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. पुरामुळे शहरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य पुरात भिजले आहे. त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासोबतच शहरातील हजारो दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानातील साहित्य भिजल्याने हजारो व्यावसायिक संकटात सापडले आहेत. त्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून नुकसानीच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. सत्ताधाराऱ्यांच्या चुकीमुळे झालेल्या या नुकसानीची जबाबदारी घेऊन पंचनामे केले जावे. तसेच नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
शहराला भकास केले :स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या नावाखाली नागपूर शहरात आपल्या चेल्या चपाट्यांना आणि ठेकेदारांना जगविण्यासाठी काँक्रीटचे जंगल उभे केले. त्यामुळे शहराचा विकास होण्याऐवजी शहर भकास झाले आहे. एका दिवसाच्या पावसाने देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या विकासाच्या पोकळ गप्पा, बोगस दावे आणि भाजपाचा भ्रष्ट कारभार उघडा पडला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
हेही वाचा:
- MLA Disqualification Hearing : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीत ठाकरे गटाची 'ही' आहे मागणी, शिंदे गटाचा विरोध
- Modi Criticizes Congress : कॉंग्रेसचा करार हा अर्बन नक्षलवाद्यांशी - नरेंद्र मोदी
- Ajit Pawar in Pune : निडवणूक आयोग जो निर्णय देईल तो मला मान्य; उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले