नागपूर -नागपुरात कोरोनाची भयावह स्थिती आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ७५ हजार पार गेली आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना हॅास्पीटलमध्ये नेण्यासाठी वेळेवर रूग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने आपल्या २५ मिनी बसचे रुग्णवाहिकांमध्ये रूपांतर केले आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर आजपासून (3 मे) या २५ रुग्णवाहिका सेवेत रुजू झाल्या आहेत.
खासगी रूग्णवाहिका चालक-मालकांकडून होणारी लूट थांबावी आणि रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळावी, म्हणून मनपाने २५ मिनी बसचे रूपांतर रुग्णवाहिकांमध्ये केले. यामध्ये ॲाक्सिजनचीही सोय करण्यात आली आहे. त्यासाठी वाहकाला ॲाक्सिजन देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना संकटात अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही. मिळाली तरी दोन ते तीन किलोमीटर अंतराचे हजारो रूपये मोजावे लागत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त होत आहेत. या अनेक तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपाच्या 'आपली बस' सेवेतील २५ मिनी बसचे रूपांतर रुग्णवाहिकांमध्ये करण्यात आले आहे.
रुग्णवाहिकेसाठी येथे करा संपर्क