नागपूर- उपराजधानी नागपुरात कोरोनाचा दररोज होत असलेला उद्रेक बघता आज महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पाचपावली कोविड केअर सेंटर, पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाचपावली सुतिकागृहला अचानक भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा हे देखील उपस्थित होते.
शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोविड केअर सेंटरला उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी आढावा घेतला. शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचणींची संख्या आणि वेग वाढवने आवश्यक आहे. या उद्देशाने मनपा आयुक्तांनी शहरातील कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढवली. मात्र, यासोबतच चाचणी करताना योग्य खबरदारी घेतली जात आहे अथवा नाही, निर्धारित वेळेतच चाचणी केली जाते का ? चाचणी करण्यात येणाऱ्या नागरिकांकडून नियमांचे पालन करवून घेतले जाते का ? या सर्व बाबींची पाहणी करण्यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. व अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी आकस्मिक भेट दिली.