नागपूर- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार नागपूर शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेसह जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही अधिक वाढला आहे.
नियमांचे उल्लंघन करून फौजदारी कारवाई करण्यास नागरिकांनी बाध्य करू नये- तुकाराम मुंढे - नागपूर लॉकडाऊनचे उल्लंघन
नागपुरात लॉकडाऊनचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमिवर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला आहे.
नागरिक कोरोनाच्या नियमावलीचे पालन करताना दिसत नाहीए, यावरून महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच संतापले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ, स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे नाही. चारचाकी वाहनात तिघांना आणि दुचाकीवर केवळ एका व्यक्तीला परवानगी असताना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, आवश्यकता नसतानाही घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा वागण्यामुळे नागपुरात कोरोनाचा गुणाकार होण्यास सुरुवात झाली असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
शहराला सुरक्षित ठेवायचे असेल तर नागरिकांनी नियम पाळायलाच हवे. नियमांचे उल्लंघन करून फौजदारी कारवाई करण्यास नागरिकांनी बाध्य करू नये, अशा शब्दांत तुकाराम मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.