नागपूर -मागील काही महिन्यांपासून नागपूर ग्रामीणच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या अपघातांची संख्या ( Nagpur Accident News ) वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या ग्रामीण पोलिसांनी एक सर्वे ( Nagpur Police Survey ) केला होता. त्यानूसार, ग्रामीण भागात दुपारी 4 ते रात्री 8 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, या अपघातांमध्ये मोठ्या संख्येने तरुण बळी पडत आहे. त्यासाठी आता ग्रामीण पोलिसांकडून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात उपक्रम हाती घेतला जाणार आहे.
या कारणांनी घडले अपघात
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण ( Nagpur Rural Area ) भागात अपघातांची संख्या वाढतच आहे. त्यासाठी जिल्हात मार्ग सुरक्षा अभियान राबवण्याची योजना पोलिसांनी आखली आहे. मात्र, त्यापूर्वी होणाऱ्या अपघातांच्या संदर्भात अभ्यास करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी 2021 या वर्षात झालेल्या अपघातांची संख्या तपासली. तेव्हा दुपारी 4 ते रात्री 8 या वेळात सर्वाधिक अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. वेगाने गाडी चालवणे, चुकीच्या मार्गाने गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे या कारणांनी सर्वाधिक अपघात घडले आहे. त्याच अनुषंगाने आता भविष्यात अपघातांची संख्या कमी होण्यासाठी वर्ग आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.