नागपूर -कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच आता शासकीय कार्यालयातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता प्रादुर्भाव देखील वाढतच चालला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हळूहळू जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह येत आहेत. आत्तापर्यंत ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी आवश्यक असेल तरच कार्यालयात यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
शहरातील कोरोना स्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयातही कोरोना फोफावत असल्याचे चित्र आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर ते गृह अलगीकरणात आहेत. मात्र, कार्यालयात कोरोना फैलाव वाढत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ५० कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय कार्यालयातील एका शिपाईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे.