नागपूर- देशात मंदी आली आहे असे म्हटले जात आहे. पण, सध्या देशाचा जीडीपी 5 टक्यांवर वर आहे, जेव्हा तो शून्यावर येतो तेव्हा मंदी आली असे म्हटले जाते. सरकार उपाय करत आहे. पण, केवळ सरकार हे नाही करू शकत. आपल्यालाही काही उपाय करावे लागतील. सरकारवर विश्वास ठेवायला पाहिजे, आर्थिक क्षेत्रातील व्यक्ती मजबूत आहेत. खासगीकरण, एफडीआय या माध्यमातून सरकार प्रयत्न करत आहे. जगातील मंदीचा प्रभाव आपल्या देशावर पडत नाही. कृषी, लघु, मध्यम, पर्यटन यांसारख्या उद्योगांना वाढवले पाहिजे. रोजगार वाढवले पाहिजे, सरकार चांगल्या योजना बनवत आहे. आपल्या अर्थव्यस्थेला खूप छेद होते ते छेद बुजवण्याचे कार्य सुरू आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपूरच्या रेशीमबाग येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री विके सिंग यांचीही उपस्थिती होती.