नागपूर- राज्यातील दुष्काळ व पाणीटंचाईमुळे जनता हवालदिल झाली आहे. यावर सरकारच्या उपाययोजना केवळ ऑनलाईन आहेत, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारला चाराटंचाईच्या मुद्द्यावर धारेवर धरत जलयुक्त शिवार योजनाही फसवी असल्याचे वडेट्टीवार यावेळी म्हणाले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार योजना फसवी - आमदार विजय वडेट्टीवार - jalyukt shiwar
राज्यातील दुष्काळ व पाणीटंचाई या मुद्यावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निषाणा साधला.
जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणी पातळीमध्ये किती वाढ झाली, हे शासनाने दाखवावे. ही योजना फसल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवारमध्ये कोट्य़वधी रुपये निधी खर्च होऊन देखील त्याचा फायदा कुठेच दिसत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत खर्च झालेल्या निधीचा अहवाल मुख्यमंत्रीनी सादर करावा. तसेच दुष्काळग्रस्त नरखेड आणि काटोल भागातील संत्राबागा बऱ्याच प्रमाणात वाळल्या आहेत. तरीही विदर्भात एकाही ठिकाणी चारा छावणी सुरू झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.