नागपूर- महाविकास आघाडीचे दोन युवा आमदार रोहित पवार आणि धीरज देशमुख यांनी आज नागपूरच्या दीक्षा भूमीला भेट दिली. येथे दोघाही युवा आमदारांनी बाबासाहेबांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेतले. यावेळी रोहित पवार आणि धीरज देशमुख यांनी दीक्षाभूमी परिसरात गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी रोहित पवार यांनी दीक्षाभूमी परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला.
यावेळी दीक्षाभूमीवर येऊन प्रेरणा मिळते. अधिवेशनाचा पहिला अनुभव चांगला होता. वरिष्ठ नेत्यांनी आम्हा युवकांना सभागृहामध्ये बोलण्याची संधी दिली असे म्हणत रोहित पवार यांनी वरिष्ठांचे आभार माणले. दरम्यान, २५ दिवस झालेल्या सरकारला प्रलंबित कामाबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार ५ वर्ष सत्तेत राहिलेल्या भाजपला नाही, असा टोला देखील आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हाणला. त्याचबरोबर, सीएबी विरोधात आंदोलन करण्याऱ्या तरुणांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले.