नागपूर - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गुंता आता संपूर्णपणे सुटल्याचे दिसत आहे. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार असल्याची भविष्यवाणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच केली होती. त्यांचा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे निवडणुकीच्या आधीच ठरले होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भाजपच्या विरोधात व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत शिवसेना देखील येणार असल्याचे भाकीत अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेदरम्यान केले होते. त्यांची ही भविष्यवाणी आज खरी झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ आमदार देशमुख यांचे मीडिया प्रभारी आणि पत्रकार उज्वल भोयर यांनी सर्वांना उपलब्ध करवून दिला आहे.