नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर एम्सचे डॉ. मनीष श्रीगिरीवार तसेच अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत रूग्णालयांतील ऑक्सिजनची उपलब्धता, बेड्सची उपलब्धता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच 'एम्स'मध्ये ताबडतोब ५०० बेड्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी केली. इतर रुग्णालयांमध्ये देखील बेड्सची संख्या वाढवण्यात यावी, अशा सूचनाही गडकरी यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
गडकरी 'अॅक्शन मोड'मध्ये
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरसह विदर्भातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. रुग्णालयातील बेड वाढवणे, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करणे आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता ते सातत्याने प्रयत्नात आहेत. नागपूरात आरटीपीसीआर चाचण्या तातडीने व्हाव्यात यासाठी गडकरी यांनी 'स्पाईस जेट (हेल्थ)'चे मालक अजय सिंह यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून आरटीपीसीआर टेस्टसाठी नागपूरला दोन मोबाइल चाचणी लॅब देण्याची विनंती केली. 'स्पाइस हेल्थ'ने ही विनंती मान्य करत मोबाइल टेस्ट लॅब ताबडतोब नागपूरला पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे. या एका लॅबमध्ये ३५० रुपयांत प्रती दिन ३ हजार लोकांच्या चाचण्या करता येऊ शकतील
नितीन गडकरी यांनी नागपूरातील कोविड स्थितीत उचललेली पावले
१) रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी गडकरी यांनी 'सन फार्मा'चे दिलीप सिंघवी यांच्याशी पाच दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यानंतर आतापर्यंत नागपूरात ४ हजार ९०० व विदर्भातील इतर ठिकाणी ५०० इंजेक्शन्स पोहोचले आहेत.
२) 'मायलॉन लॅबरॉटरीज'चे भारतातील सीईओ राकेश बोमजाई यांच्याशी देखील गडकरी यांनी दूरध्वनीवरून संपर्क केला होता. त्यानंतर मायलॉनकडून नागपूरसाठी ६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची पूर्तता करण्यात आली आहे. अवघ्या पाच दिवसात एकूण ११ हजार ४०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स नागपूरला मिळाले आहेत.
3) रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात पंतप्रधान व केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशीदेखील गडकरींनी दूरध्वनीवरून पाठपूरावा केला. त्यानुसार रेमडेसिवीरची निर्मिती 10 लक्ष वायल प्रति महिना वाढवण्यास व नवीन प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी मिळवून दिली. याचा केवळ नागपूरलाच नाही, तर संपूर्ण राज्याला फायदा होणार आहे.